‘वनवासी’ शब्दप्रयोगाच्या निषेधार्थ कुरखेड्यात आदिवासी समाजाचा विराट मोर्चा

33

‘वनवासी’ शब्दप्रयोगाच्या निषेधार्थ कुरखेड्यात आदिवासी समाजाचा विराट मोर्चा
-गृहमंत्र्यांनी माफी मागावी ; हजारो आदिवासी बांधवांचा एसडीएम कार्यालयावर धडक मोर्चा
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख ‘वनवासी’ असा केल्याच्या निषेधार्थ कुरखेडा येथे समस्त ४५ पोटजातींच्या आदिवासी समाजाच्या वतीने सोमवारी भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. बिरसा मुंडा चौक (नवीन बसस्थानक) येथून निघालेला मोर्चा उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
दिल्ली येथे आयोजित जनजाती बांधवांच्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाचा उल्लेख ‘वनवासी’ असा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. हा शब्दप्रयोग आदिवासी समाजाच्या अस्मितेला धक्का देणारा असून आदिवासी हे जल, जंगल आणि जमिनीचे मूळ मालक तसेच देशाचे मूलनिवासी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे संवैधानिकदृष्ट्या मान्य असलेला ‘आदिवासी’ हाच शब्द वापरण्यात यावा आणि या वक्तव्याबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा तालुक्यांतील हजारो आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही आंदोलन करण्यात आले. मोर्च्यानंतर उपविभागीय अधिकारी किरण वाघस्कर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनात आमदार रामदास मसराम, समस्त ४५ पोटजाती आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरेटी, रामसूराम काटेंगे, डॉ. मेघराज कपूर, शालीकराम मानकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, माधव गावळ, संजय कोकोडे, प्रभाकर तुळावी, गिरीधर तितराम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी, दिलीप घोडाम, अरुण सोयाम, प्रभाकर जुमनाके, जिग्नेश वरखेडे, आशाताई तुळावी यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आपचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी, काँग्रेसचे पदाधिकारी आणि विविध तालुक्यांतील प्रतिनिधींसह हजारो आदिवासी बांधवांनी मोर्चात सहभाग घेतला.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Kurkheda #AdivasiMorcha #TribalCommunity #VanvasiRemark #AmitShah #ProtestMarch #Gadchiroli #SDMOffice #AdivasiRights #MaharashtraNews #BirsaMunda #TribalUnity #KurkhedaNews #VidarbhaNews #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here