‘जमीन देणार नाही’चा एल्गार ; जैरामपूर परिसरातील १३ गावांचा MIDC जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध

28

‘जमीन देणार नाही’चा एल्गार ; जैरामपूर परिसरातील १३ गावांचा MIDC जमीन अधिग्रहणाला तीव्र विरोध
The गडविश्व
ता.प्र/चामोर्शी, दि. ८ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात जैरामपूर परिसरातील १३ गावांतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकवटत तीव्र विरोध दर्शविला आहे. गणपूर रै. येथे शनिवारी (७ जून) आयोजित शेतकरी सभेत “आमची जमीन आम्ही देणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी अधिग्रहणाविरोधात एल्गार पुकारला.
जैरामपूर, मुधोली चक क्रमांक २, मुधोली तुकूम, यादवपल्ली, पारडीदेव, बामणीदेव, गणपूर रै., विठ्ठलपूर, सेल्लूर, लक्ष्मणपूर, किष्टापूर, दुर्गापूर, चित्तरंजनपूर आणि येणापूर या गावांतील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
दरम्यान, गणपूर रै. ग्रामसभेत ५ जून रोजी झालेल्या बैठकीत प्रस्तावित प्रकल्पास विरोध करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांच्या मते, प्रस्तावित लोह प्रकल्प गावाच्या वस्तीच्या अत्यंत जवळ उभारला जाणार असल्याने भविष्यात प्रदूषण, आरोग्यविषयक समस्या, शेतीचे नुकसान तसेच जलस्रोतांवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे.
सभेत बोलताना शेतकऱ्यांनी अधिग्रहणासाठी प्रस्तावित जमीन अत्यंत सुपीक असून अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जमीन हस्तांतरित केली जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी प्रशासनाकडे सामूहिक हरकती सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच अधिग्रहण प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, ग्रामसभांच्या ठरावांचा आदर राखावा आणि स्थानिक नागरिकांच्या भावना व हिताचा विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.
ग्रामस्थांनी इशारा दिला की, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. “शेती वाचवा, गाव वाचवा, जमीन देणार नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या भूमिकेमुळे जैरामपूर परिसरातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Jairampur #MIDC #LandAcquisition #Chamorshi #FarmersProtest #SaveFarmland #Maharashtra #Gadchiroli #RuralVoices #VillageUnity #AgricultureFirst #LandRights #GanpurRai #FarmerMovement #DevelopmentDebate #PeoplePower #GroundReport #MaharashtraNews #LocalNews #BreakingNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here