आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका ; धान खरेदी केंद्रे अद्याप बंद, शेतकरी संकटात

20

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेचा फटका ; धान खरेदी केंद्रे अद्याप बंद, शेतकरी संकटात
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. ३० : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने परिसरातील हजारो शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मागील हंगामातील धानाचा साठा गोदामांमधून अद्याप उचलण्यात आलेला नसल्यामुळे नवीन धान खरेदीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
शेतकऱ्यांनी कापणी करून धान तयार ठेवून जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला असतानाही खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी घराच्या अंगणात तसेच शेतातील मोकळ्या जागेत धान साठवून ठेवण्यास मजबूर झाले आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. अवकाळी किंवा मुसळधार पावसामुळे धान भिजून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, मागील हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाचा साठा शासनाने तब्बल सहा महिन्यांनंतरही उचललेला नाही. दरवर्षी हीच समस्या निर्माण होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतेही ठोस नियोजन केले जात नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. धान खरेदी व साठवणुकीची जबाबदारी असलेल्या यंत्रणांची उदासीनता शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरत आहे.
एकीकडे वाढता उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अनिश्चितता यांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दुसरीकडे शासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सहन करावा लागत आहे. तात्काळ धान खरेदी केंद्रे सुरू करून गोदामांतील जुना साठा उचलण्यात यावा, अन्यथा होणाऱ्या आर्थिक नुकसानीस शासनच जबाबदार राहील, असा इशारा शेतकरी वर्गाने दिला आहे.
दरम्यान, खरेदी केंद्रे सुरू होण्यास होणारा विलंब आणि धान साठवणुकीची गंभीर समस्या लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here