चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेत फेरबदल; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गडचिरोलीत सत्कार
– संघटना बळकटीसाठी एकजुटीचा संदेश, सहविचार सभेत कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन २२ मे २०२६ रोजी शेगाव येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनानंतर २६ मे रोजी गडचिरोली येथे प्रकल्प कार्यकारिणीच्या वतीने सहविचार सभा व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात गडचिरोली प्रकल्प कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष जितेंद्र दोडके यांची विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच प्रकल्प सचिव तेजस घुटके यांची गडचिरोली प्रकल्प अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ही नियुक्ती राज्याध्यक्ष बाळकृष्ण संखे व उपाध्यक्ष हरिचंद्र यांच्या नेतृत्वात करण्यात आली. तसेच माजी विभागीय अध्यक्ष संतोष तुरकर यांचा राज्य कार्यकारिणीत समावेश करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सभेमध्ये नवनियुक्त विभागीय अध्यक्ष जितेंद्र दोडके यांनी संघटना अधिक सक्षम व बळकट करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. तर प्रकल्प अध्यक्ष तेजस घुटके यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन हरिदासजी पत्रे यांनी केले, तर आभार मुखरुजी लाडवे यांनी मानले. संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक रमेशजी इंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संघटनात्मक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
या सहविचार सभेला संजय कसनवार, बारसागडे, कोल्हे, मनोज सोमणकर, गुरुदेव गोरटेकर, कमलेश वालदे, तुळशीराम आलबनकर, रालाबंडी चलाख, वलादे, वाळके यांच्यासह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews














