लग्नाची वरात परतताना भीषण अपघात : दुचाकीला धडक देत बोलेरो पलटली, महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी

60

लग्नाची वरात परतताना भीषण अपघात : दुचाकीला धडक देत बोलेरो पलटली, महिलेचा मृत्यू, १७ जण जखमी
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २६ : लग्न समारंभ आटोपून वरात घेऊन परतणाऱ्या बोलेरो वाहनाचा विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी भीषण अपघात झाल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर गरोदर महिलेसह १७ जण जखमी झाले आहेत. यातील १० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी (२५ मे) सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मालेवाडा–येरकड मार्गावरील सुरसुंडी गावाजवळील वळणावर घडली.
या अपघातात बबिता गावतुरे (वय ५६, रा. चिंचोली) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील वरपक्ष मालेवाडा येथे विवाह सोहळा आटोपून बोलेरो वाहनाने परतत होता. त्याचवेळी येरकड येथील दुचाकीस्वार दुसऱ्या लग्न समारंभासाठी पुराडा येथे जात होता. सुरसुंडी गावाजवळील वळणावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहन नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटले. या अपघातात बबिता गावतुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर बोलेरोमधील गरोदर महिलेसह १७ जण जखमी झाले. गंभीर जखमींना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले असून इतर जखमींवर धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये रोशन रामचंद्र ढलाल (२६), गौतम मडावी (३०, येरकड), जयश्री शेंडे (४५, तळेगाव), देवांगना गावतुरे (गरोदर माता, चिंचोली), अशोक मोहरले (१५, माडेमुल), मिराबाई गुरनुले (६०, मोहली), शालू मोहुरले (४१, माडेमुल), पी. एल. गावतुरे (९, चिंचोली), वंशिका गावतुरे (६, चिंचोली), सुखदेव गावतुरे (३५, चिंचोली), शिवम गावतुरे (५, मोहली), सोनू मोहुरले (१३, माडेमुल), मिराबाई गुरनुले (५८, मोहली), शालू मोहर्ले (३८, माडेमुल), राकेश गावतुरे (३५, चिंचोली), कमल ढलाल (१७, मुस्का) आणि अद्विका शेंडे (३, तळेगाव) यांचा समावेश आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लग्नाच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here