आपत्कालीन कोट्यावर खाजगी वाहनांना इंधन? नागरिकांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २६ : इंधन टंचाईच्या काळात अत्यावश्यक सेवांसाठी राखीव ठेवलेल्या इंधन कोट्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही शासकीय कर्मचारी शासकीय ओळखपत्राचा वापर करून खाजगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिक पेट्रोलसाठी तासनतास रांगेत उभे राहत असताना अनेकांना “स्टॉक संपला” असे सांगून रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. दुसरीकडे काही वाहनांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप होत असल्याने पेट्रोल पंपांवर नाराजी वाढू लागली आहे.
या प्रकारामुळे काही ठिकाणी नागरिक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. “कर भरूनही आम्हालाच प्रतीक्षा का?” असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, आपत्कालीन सेवांसाठी राखीव इंधन नेमके कोणाच्या आदेशाने आणि कोणत्या निकषांवर दिले जात आहे, याची चौकशी करून गैरवापर होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.














