अहेरीत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा ; NFIW च्या तालुका अध्यक्षपदी कॉ. नेहा नारलावार यांची नियुक्ती

19

अहेरीत महिला सक्षमीकरणाला नवी दिशा ; NFIW च्या तालुका अध्यक्षपदी कॉ. नेहा नारलावार यांची नियुक्ती
The गडविश्व
अहेरी, दि. २२ : अहेरी तालुक्यात महिला सक्षमीकरण आणि महिला हक्क चळवळीला अधिक बळ मिळणार असून, नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमन (NFIW) च्या तालुका अध्यक्षपदी कॉ. नेहा नारलावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी NFIW जिल्हा नेतृत्वाच्या सूचनेनुसार ही नियुक्ती जाहीर केली.
कॉ. नेहा नारलावार यांच्या नियुक्तीमुळे अहेरी तालुक्यातील महिलांना आणि युवतींना सक्षम नेतृत्व लाभणार असल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आणि युवतींच्या समस्या संघटितपणे मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी या नियुक्तीकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना कॉ. नेहा नारलावार यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, शिक्षणातील अडथळे, आरोग्य सुविधा, बेरोजगारी, ग्रामीण भागातील बालविवाह, महिलांवरील अत्याचार आणि विविध सामाजिक समस्यांवर ठोसपणे काम केले जाईल. महिलांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक करून त्यांना संघटित करण्यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अहेरी तालुक्यातील महिला व युवतींना NFIW मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत, हक्कांसाठी संघटित लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, NFIW च्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने काम सुरू असून, कॉ. नेहा नारलावार यांच्या नेतृत्वाखाली अहेरी तालुक्यात महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील.
या नियुक्तीनंतर स्थानिक महिला व युवतींमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून, महिला प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here