गडचिरोली–उमरखेड बसचा भीषण अपघात ; मुरखळा (नवेगाव) नजीक बस पलटली, दोघांचा मृत्यू
– अनेक प्रवासी जखमी, आमदार डॉ. नरोटे यांची रुग्णालयात धाव
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली आगारातून दररोज सकाळच्या सुमारास उमरखेडकडे जाणाऱ्या नियमित प्रवासी बसचा मुरखळा (नवेगाव) परिसरात आज (२१) भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील बस धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटली. या भीषण दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एका वर्षाच्या चिमुकल्यासह काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आगारातून दररोज सकाळच्या सुमारास गडचिरोली–उमरखेड मार्गावर धावणाऱ्या या बसमध्ये आज जवळपास ५० प्रवासी प्रवास करत होते. अचानक झालेल्या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रवाशांच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
या भीषण अपघातामुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #Gadchiroli #BusAccident #GadchiroliUmarkhedBus #RoadAccident #Murkhala #Navegaon #BreakingNews #MaharashtraNews #AccidentNews #BusCrash #EmergencyResponse #HospitalUpdate #DrNarote #GadchiroliNews #RoadSafety #Maharashtra #LatestNews #PublicSafety #BusOverturn #NewsUpdate













