कुरखेड्यात रुग्णवाहिका बेवारस ; सती नदी काठावर धूळ खात उभी

12

कुरखेड्यात रुग्णवाहिका बेवारस ; सती नदी काठावर धूळ खात उभी
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १९ : दुर्गम भागात वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांचे जीव धोक्यात येत असताना, कुरखेडा शहरात मात्र लाखो रुपयांची शासकीय रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून बेवारस अवस्थेत धूळ खात उभी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सती नदी काठावरील वॉर्ड क्रमांक १६ मधील पाण्याच्या टाकीजवळ MH 33 T 3042 क्रमांकाची रुग्णवाहिका बिगरवापर अवस्थेत पडून असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
काही दिवसांपूर्वीच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गेवर्धा येथील एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे तालुकाभर हळहळ व्यक्त होत असतानाच, दुसरीकडे रुग्णसेवेसाठी असलेली अत्यावश्यक सुविधा वापराअभावी धूळ खात पडून राहिल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, करदात्यांच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली ही रुग्णवाहिका अशा अवस्थेत उभी राहणे म्हणजे सार्वजनिक निधीची उघड उधळपट्टी असून रुग्णसेवेची थेट थट्टा आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभाग आणि संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
संतप्त नागरिकांनी प्रशासनासमोर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. ही रुग्णवाहिका नेमकी कोणत्या विभागाच्या ताब्यात आहे? ती सेवेत का नाही? तिच्या दुरवस्थेला जबाबदार अधिकारी कोण? याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
लाखो रुपयांची रुग्णवाहिका उघड्यावर धूळ खात पडून आहे आणि दुसरीकडे रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रुग्णवाहिका सेवेत आणावी, अशी मागणी कुरखेडावासीयांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि धूळ खात उभी असलेली ही रुग्णवाहिका पुन्हा रुग्णसेवेसाठी कधी धावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #kurkheda #ambulance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here