धानोऱ्यात पाणीटंचाईचे संकट : आ. डॉ. नरोटे यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा

18

धानोऱ्यात पाणीटंचाईचे संकट : आ. डॉ. नरोटे यांच्याकडून मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा
– नगरपंचायतीची नळयोजना ठप्प, नागरिकांची भटकंती, महिलांना मोठा दिलासा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : धानोरा नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेत अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात नळाचा पाणीपुरवठा बंद पडल्याने महिलांसह अनेक कुटुंबांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. अशा गंभीर परिस्थितीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पुढाकार घेत मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ मेपासून शहरातील नळाचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषतः महिलांना घरगुती वापरासाठी पाणी मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, नागरिकांना दिलासा देण्याची प्राथमिक जबाबदारी नगरपंचायतीची असताना प्रशासनाकडून अद्याप स्वतःचे टँकर सुरू करण्यात आले नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. नगरपंचायतीच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांचा रोष वाढत असतानाच आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी तत्परता दाखवत शहरात ट्रॅक्टर व टँकरच्या माध्यमातून मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
सध्या शहरातील अनेक भागांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून महिलांनी आमदार नरोटे यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर नळयोजनेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here