कुरखेडा : कत्तलीसाठी निघालेल्या २० गोवंशीयांची सुटका, ट्रकसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
– पुराडा पोलिसांची धडक कारवाई
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशीय जनावरांची अमानुष पद्धतीने होत असलेली अवैध वाहतूक उघडकीस आणत पुराडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून चालकासह दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे २०२६ रोजी पहाटे पुराडा पोलिसांना गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने कोरची ते कुरखेडा मुख्य मार्गावर सापळा रचून संशयित टाटा ११०९ कंपनीचा सहा चाकी ट्रक (क्र. MH 18 AA 9747) अडवला. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत ट्रकमध्ये २० गोवंशीय बैल अत्यंत निर्दयीपणे कोंबून भरल्याचे आढळून आले.
वाहनात जनावरांच्या आकारमानाच्या तुलनेत अत्यंत कमी जागा असल्याने त्यांना साधी हालचाल करणेही अशक्य झाले होते. कोणतीही वैध परवानगी नसताना कत्तलीसाठी त्यांची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सर्व जनावरांची सुटका केली.
जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये पांढरे, काळे, धामण व लाल रंगाचे विविध जातींचे बैल समाविष्ट असून त्यांची अंदाजे किंमत १ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तर वाहतुकीसाठी वापरलेला टाटा ट्रक ४ लाख रुपये किमतीचा आहे. अशा प्रकारे एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी शाहरुख बरकतअली सय्यद (वय २८, रा. गेवर्धा, ता. कुरखेडा) व जमिल पठाण (रा. गेवर्धा, ता. कुरखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक बळीराम सखाराम पदा यांच्या फिर्यादीवरून आरोपींवर प्राणी संरक्षण कायदा १९९५ (सुधारित) तसेच प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार सुमेध खंडसे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #crimenews














