“गोदाम आम्ही देतो, खरेदी केंद्र सुरू करा”; धानोऱ्यातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे आर्त हाक

39

“गोदाम आम्ही देतो, खरेदी केंद्र सुरू करा”; धानोऱ्यातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे आर्त हाक
– मका खरेदी केंद्र नसल्याने शेकडो शेतकरी अडचणीत
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. १७ : धानोरा तालुक्यात रब्बी हंगामात पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन शेकडो शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड केली. शासनाने हमीभावाने मका खरेदी करण्याचे आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी, सातबारा अद्ययावत करणे तसेच पीकपेरा प्रक्रिया पूर्ण केली. मका पिकाची काढणीही झाली आहे. मात्र, अद्याप तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
याबाबत धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी १५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, उपप्रादेशिक कार्यालय धानोरा येथील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता गोदाम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी यावर पर्याय म्हणून मौजा मेंढा येथे शासकीय निधीतून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले ३०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम तसेच कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेले आणखी ३०० मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
या दोन्ही गोदामांचे एकूण ६०० मेट्रिक टन साठवण क्षमता असून, गोदाम भाड्याची रक्कम शासकीय दरानुसार देण्यास मेंढा ग्रामसभेनेही मंजुरी दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने विनाविलंब मका खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर डॉ. देवाजी तोफा (समाजसेवक, मेंढा लेखा), बाजीराव रामा नरोटे (अध्यक्ष, तालुका पारंपारिक महाग्रामसभा धानोरा), प्रदीप बोगा (सचिव), कृष्णाजी भुरकुर्या (सचिव, ग्रामसभा माळदा), अमित नरोटे (अध्यक्ष, ग्रामसभा चव्हेला), शामराव उसेंडी (सचिव, ग्रामसभा पवनी), बाजीराव वालको (अध्यक्ष, ग्रामसभा गुजनवाडी), रामचंद्र कुदेशी (पोलीस पाटील, मिचगाव खुर्द), आर.आर. कुकबेशी, मडगुजी गावळे (सचिव, ग्रामसभा ऐरंडी), राजीराम कोवा (अध्यक्ष, ग्रामसभा निमगाव), रोशन कन्नाके (सचिव, ग्रामसभा रांगी), डोमराज गावळे (शेतकरी, येरंडी), वासुदेव कुमोटी (पोलीस पाटील, येरंडी) तसेच सुधाकर गावळे (अध्यक्ष, वनसंरक्षण समिती, येरंडी) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here