गडचिरोलीत माओवादावर ‘अंतिम प्रहार’; ८ माओवादी अटकेत, ५ जणांचे आत्मसमर्पण, पोलिसांच्या अभिलेखावर एकही सक्रिय माओवादी नाही

116

गडचिरोलीत माओवादावर ‘अंतिम प्रहार’; ८ माओवादी अटकेत, ५ जणांचे आत्मसमर्पण, पोलिसांच्या अभिलेखावर एकही सक्रिय माओवादी नाही
– ५१ शस्त्रे, ६५ लाखांची रोकड जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली पोलीस दल आणि सीआरपीएफने माओवादविरोधी मोहिमेत ऐतिहासिक यश संपादन करत “ऑपरेशन अंतिम प्रहार” अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. एका बाजूला ८ जहाल माओवाद्यांना अटक करण्यात आली असून दुसऱ्या बाजूला ५ वरिष्ठ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या दुहेरी कारवाईमुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला निर्णायक हादरा बसला असून पोलिसांच्या अभिलेखावर आता एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ०२ एलएमजी, ०४ एके-४७, ०४ एसएलआर, ०३ इन्सास रायफलसह एकूण ५१ अग्निशस्त्रे, मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि ६५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड जप्त केली. अटक करण्यात आलेल्या ८ माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६४ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तर आत्मसमर्पण केलेल्या ५ वरिष्ठ माओवाद्यांवर ३८ लाखांचे बक्षीस घोषित होते.

फोदेवाडा चकमकीतील आरोपींसह ८ माओवादी जेरबंद

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलिसांनी विशेष शोध मोहीम राबवून तेलंगणातून ४, कुमनार येथून २ आणि नैताळा येथून २ अशा एकूण ८ माओवाद्यांना अटक केली. यामध्ये ७ फेब्रुवारी २०२६ रोजी फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका सी-६० जवानाच्या हत्येत सहभागी असलेल्या माओवाद्यांचाही समावेश आहे.
रुकमापूर रेल्वे स्थानक, जि. विकाराबाद (तेलंगणा) येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामध्ये जयराम मोंगे गावडे, मुकेश ऊर्फ लच्छु अवलाम, विजय ऊर्फ मंगडू तामो आणि रजिता ऊर्फ शामबत्ती मडावी यांचा समावेश होता. चौकशीतून फोदेवाडा जंगलात लपवून ठेवलेली .३०३ रायफल, दोन बारा बोअर बंदुका आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

कुमनारमध्ये AK-47सह दाम्पत्य पकडले

लाहेरी हद्दीतील कुमनार येथे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कंपनी क्रमांक १० चा प्रभारी डीव्हीसीएम राजु ऊर्फ मंगडू वेको आणि त्याची पत्नी जनी ऊर्फ नगी येमला यांना अटक केली. त्यांच्याकडून एक AK-47, एक .३०३ रायफल, एक बारा बोअर रायफल आणि माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
या दोघांच्या चौकशीतून गुंडेनूर जंगल परिसरात लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला. पोलिसांनी तेथून ०१ एसएलआर एलएमजी, ०१ इन्सास एलएमजी, ०३ AK-47, ०३ एसएलआर रायफल, ०२ इन्सास रायफल, ०१ .३०३ रायफल, ०१ बीजीएल लॉन्चर, ३५८ जिवंत काडतुसे आणि ६३ लाख ८४ हजार रुपयांची रोकड जप्त केली.

नैताळ्यात दोन महिला माओवादी अटकेत

पोमके गर्देवाडा हद्दीतील नैताळा गावात राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेत ज्योती ऊर्फ अकिला ऊर्फ समिता पोटावी आणि आमती ऊर्फ आयती ऊर्फ संध्या पोडीयाम या दोन महिला माओवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, बारा बोअर रायफल आणि सिंगल शॉट रायफल जप्त करण्यात आली. पुढील शोध मोहिमेत इन्सास रायफल, .३०३ रायफल, ०८ बारा बोअर बंदुका, डेटोनेटर, बीजीएल सेल आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा जप्त करण्यात आला.

५ वरिष्ठ माओवाद्यांचे आत्मसमर्पण

या मोठ्या कारवाईसोबतच १६ मे रोजी ०१ डीव्हीसीएम, ०१ पीपीसीएम, ०१ एसीएम आणि ०२ सदस्य अशा एकूण ५ वरिष्ठ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये मधु ऊर्फ राकेश ऊर्फ बाजीराव वेळदा (डीव्हीसीएम), जिवन ऊर्फ जग्गु मडकाम (पीपीसीएम), रजनी ऊर्फ दुर्गा धुर्वा (एसीएम), मंगली रघु कुरसाम आणि लक्ष्मी डेंगा पुनेम यांचा समावेश आहे. या पाचही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे अनेक माओवादी मुख्य प्रवाहात परत येत आहेत. सन २०२५ पासून आतापर्यंत १३७ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून २०२२ पासून हा आकडा १७१ वर पोहोचला आहे. तर २००५ पासून आतापर्यंत गडचिरोली पोलीस दलासमोर तब्बल ८१९ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीला मोठा धक्का

पोलीस प्रशासनाने सांगितले की, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भूपती याने ६१ माओवाद्यांसह आत्मसमर्पण केल्यानंतर दंडकारण्यातील माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर देशभरात १०६३ माओवाद्यांनी ६३७ शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.

संयुक्त कारवाईला वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही संपूर्ण कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. तसेच विशेष अभियान पथक, प्राणहिता आणि गडचिरोली येथील अधिकारी व जवानांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #OperationAntimPrahar #MaoistSurrender #AntiNaxalOperation #GadchiroliPolice #CRPF #MaoistArrest #NaxalFreeGadchiroli #MaharashtraPolice #BreakingNews #MaoistOperation #SecurityForces #IndiaNews #Naxalism #PoliceAction

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here