मोहलीत गांजाची शेती करून विक्रीची तयारी ; ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

113

मोहलीत गांजाची शेती करून विक्रीची तयारी ; ६८ लाखांचा मुद्देमाल जप्त
– स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलिसांची संयुक्त धडक कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून धानोरा तालुक्यातील मोहली येथे गांजाची लागवड करून विक्रीची तयारी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या शेतातून तब्बल ६८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने १४ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मोहली येथील ईश्वर सखाराम पुंघाटे (वय ५०) हा स्वतःच्या शेतात गांजाची लागवड करीत असल्याचे समोर आले.
माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखा आणि धानोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोहली येथे संयुक्त कारवाई केली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या झडतीदरम्यान आरोपीच्या शेतात गांजाची ९१ हिरवट रंगाची लहान-मोठी झाडे आढळून आली. तपासणीत या झाडांचे एकूण वजन १३६.२५ किलो इतके निघाले.
पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची बाजारभावानुसार किंमत ६८ लाख १२ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. आरोपीने विक्रीच्या उद्देशाने गांजाची लागवड केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सपोनि. प्रशांत जंगले करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here