अपघात रोखण्यासाठी कुरखेडा पोलिसांचा अभिनव उपक्रम : वाहनांवर बसविले चकाकणारे रिफ्लेक्टर
– रस्ता सुरक्षा अभियानाला वेग
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १४ : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कुरखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने अपघात प्रतिबंधासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. काल सायंकाळी पोलीस अधिकारी स्वतः रस्त्यावर उतरून मार्गावरील चारचाकी वाहनांना थांबवत त्यांच्या मागील बाजूस चकाकणारे रिफ्लेक्टर बसविण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी वाहनांची दृश्यमानता वाढून अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वाहनांची वेगमर्यादा पाळणे, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापर करणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे याबाबत जनजागृतीसह कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाहनांवर रिफ्लेक्टर बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.
या मोहिमेत ठाणेदार महेंद्र वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवराव सहारे तसेच पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.














