कुरखेडा मका केंद्राची आमदार मसराम यांनी घेतली झाडाझडती

36

कुरखेडा मका केंद्राची आमदार मसराम यांनी घेतली झाडाझडती
– खरेदी प्रक्रियेतील अनियमिततेवर अधिकाऱ्यांना दिल्या तातडीच्या सूचना
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १३ : आदिवासी विविध कार्यकारी संस्था कुरखेडा अंतर्गत सुरू असलेल्या मका खरेदी केंद्राची आमदार रामदास मसराम यांनी भेट देत खरेदी प्रक्रियेची सखोल पाहणी केली. यावेळी केंद्रावर ५१ किलो ५२० ग्रॅम वजनाने मका खरेदी सुरू असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान आमदार मसराम यांनी तहसीलदार जाधव यांना तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ५० किलो ५०० ग्रॅम प्रमाणेच मका खरेदी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार रामदास मसराम म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. खरेदी प्रक्रियेत कोणतीही अनियमितता किंवा शेतकऱ्यांचे नुकसान सहन केले जाणार नाही.”
आमदारांच्या या अचानक पाहणीमुळे मका खरेदी प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी सभापती परसराम टिकले, गिरीधर तितराम, धनपाल मिसार, माजी उपसभापती श्रीराम दुगा, माजी नगरसेवक उस्मान पठाण, भावेश मुंगणकर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here