आमदार मसराम यांची महामार्ग अधिकाऱ्यांची भर उन्हात ‘पायदळ परेड’; रखडलेल्या कामांवरून खडे बोल

72

आमदार मसराम यांची महामार्ग अधिकाऱ्यांची भर उन्हात ‘पायदळ परेड’; रखडलेल्या कामांवरून खडे बोल
– बांधकामातील दिरंगाई व अनियमिततेबाबत तीव्र नाराजी, व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १३ : कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३-सीच्या रखडलेल्या व नियोजनशून्य कामांवरून आमदार रामदास मसराम यांनी बुधवारी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बाजारपेठ ते सतीनदीपर्यंत भर उन्हात पायदळ पाहणी करत त्यांनी महामार्ग विभागाचे अधिकारी व बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवत नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाब विचारला.
शहराच्या मुख्य बाजारपेठेतून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असले तरी मागील दोन वर्षांपासून काम रखडल्याने नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी खोदून ठेवलेले खड्डे, अपूर्ण गटार बांधकाम आणि विस्कळीत नियोजनामुळे वाहतूक, व्यापार तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली.
लवकरच पावसाळा सुरू होणार असल्याने मुख्य बाजारपेठेत पुन्हा खोदकाम करून काम अपूर्ण ठेवण्यात आल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. यावर आमदार मसराम यांनी कामाचे योग्य नियोजन करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी व्यापारी संघटनेचे विवेक निरंकारी यांनी रखडलेल्या कामांमुळे व्यापाऱ्यांना सहन कराव्या लागत असलेल्या आर्थिक व मानसिक यातनांची कैफियत मांडली. “यावर्षी पावसाळ्यापूर्वी रखडलेले बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा मुख्य बाजारपेठेत नव्याने खोदकाम करू नये. तसे न झाल्यास व्यापारी संघटनेच्या वतीने बाजारपेठ बंद ठेवून महामार्ग विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर, उपविभागीय अभियंता अमित रामटेके, शाखा अभियंता शंभूनाथ स्वामी, बांधकाम कंपनीचे एमडी पराग केसरकर, अभियंता यादव, संदीप भैसारे तसेच काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुळावी, माजी सभापती गिरीधर तितराम, नगरसेवक आशिष काळे, राम लांजेवार, परसराम टिकले, धनपाल मिसार, श्रीराम दूगा, उस्मान खान, भावेश मुंगणकर, अनिकेत आकरे, शहेजाद हाशमी, आसिफ शेख, राकेश चव्हाण यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here