मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी रांगी ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय तपासणी
– विविध सुविधांची समितीकडून पाहणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १२ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय मूल्यांकनासाठी यवतमाळ येथील समितीने सोमवार, ११ मे २०२६ रोजी ग्रामपंचायत रांगीला भेट देत विविध विकासकामांची आणि शासकीय सुविधांची सखोल पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या कामकाजासह विविध कार्यालयीन दस्तऐवजांची तपासणी करत समितीने समाधान व्यक्त केले.
यवतमाळ येथील समितीत विस्तार अधिकारी पंचायत अनिल जगताप, गट विकास अधिकारी प्रभाकर मडावी, विस्तार अधिकारी कृषी निलेश ढाकूलकर तसेच कनिष्ठ अभियंता यश इंगोले यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती घेत प्रत्यक्ष स्थळांना भेट दिली.
यावेळी अंगणवाडी केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, घनकचरा वर्गीकरण शेड, स्मशानभूमीतील सुविधा आदींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा रांगी येथे भेट देत डिजिटल शिक्षण सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयींचा आढावा घेण्यात आला.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र रांगी येथे आरोग्य सेवा, कार्यालयीन नोंदी आणि विविध वैद्यकीय सुविधांची तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत रांगी अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांचे तसेच कार्यालयीन व्यवस्थापनाचे समितीकडून कौतुक करण्यात आले.
या पाहणीवेळी ग्रामपंचायत रांगीच्या प्रशासक श्रीमती फालेश्वरी प्रदीप गेडाम, प्रशासक सदस्य नुरज सुरेश हलामी, प्रशासक समिती सदस्य शशिकांत विठ्ठलराव साळवे, दिनेश इसन चापडे, राकेश दयाराम कोराम, श्रीमती शशिकला उमाजी मडावी, श्रीमती विद्या हेमंत कपाट, श्रीमती वच्छला साईनाथ हलामी, श्रीमती अर्चना लक्ष्मीकांत मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायत अधिकारी मकरंद बापूराव बांबोडे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय तंटामुक्ती समिती अध्यक्ष तुळशीराम लक्ष्मण भुरसे, पोलीस पाटील रामचंद्र मोहन काटेंगे, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष शांताराम बरडे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













