वाघाच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू ; परिसरात भीतीचे सावट
The गडविश्व
साकोली, दि. १५ : साकोली तालुक्यातील वीरशी येथे वाघाच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशिनाथ मिरी (रा. सुहेला, जि. बलोदाबाजार, छत्तीसगड) हे आपल्या कुटुंबासह संजय कापगते यांच्या शेतात विटाभट्टीच्या कामासाठी वास्तव्यास होते. आज पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास वाघाने झोपडीवर हल्ला चढवत झोपेत असलेल्या त्यांच्या पाच वर्षीय मुलीला उचलून नेले. या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला.
दरम्यान, या परिसरात यापूर्वीही वाघिणीच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. बांपेवाडा येथे वसंता मेश्राम, तसेच छाया मुंग या महिलांचा बळी गेला असून उमरझरी येथे एका महिलेला गंभीर जखमी करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून वाघाचा माग काढण्यासाठी कॅमेरे व सापळे लावण्यात आले आहेत. मात्र अद्याप वाघ पकडण्यात यश आलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी वाघाला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी करत वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. यासाठी निवेदन देण्यात आले असून आंदोलनही छेडण्यात आले आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत बालिकेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #tiger














