कोरचीतील आदिवासी बालिकांसाठी क्रिकेटचे व्यासपीठ ; द्वितीय प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात शुभारंभ
– आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उद्घाटन; एकलव्य शाळांतील विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रात नवी दिशा
The गडविश्व
ता .प्र/ कोरची, दि.१३ : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे आदिवासी बालिकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या द्वितीय क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. क्रीडा क्षेत्रात विद्यार्थिनींना संधी उपलब्ध करून देत त्यांना उच्च स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला नगर पंचायतचे नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सदरूद्दीन भामानी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक, तसेच एसएमसी अध्यक्ष माणिकराव मडावी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
१२ ते १८ एप्रिल दरम्यान आयोजित या शिबिरात गडचिरोली जिल्ह्यातील सात एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल शाळांमधून प्रत्येकी तीन अशा निवडक विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. या विद्यार्थिनींना व्यावसायिक पातळीवरील क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जात असून भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघात स्थान मिळविण्याचा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
या उपक्रमाची धुरा ईएमआरएस कोरचीचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकूर यांच्याकडे सोपविण्यात आली असून एमटीपीएसएस स्टेट सोसायटीच्या माध्यमातून शिबिराची अंमलबजावणी केली जात आहे. प्रशिक्षणादरम्यान क्रिकेटच्या तांत्रिक कौशल्यांसह शिस्त, फिटनेस आणि संघभावना यांवर विशेष भर दिला जात आहे.
उद्घाटनप्रसंगी आमदार रामदास मसराम यांनी आपल्या भाषणात एकलव्य शाळांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचे महत्त्व अधोरेखित करत, विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रातही आपली छाप उमटवून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनीही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करत क्रीडेसोबत शिस्त व समर्पण या गुणांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्ग, आयोजक, पत्रकार व कोरची ब्लॉकमधील मान्यवरांचे सहकार्य लाभले. शेवटी आयोजकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.














