कुरखेडा तहसील कार्यालयात आदिवासी पूरग्रस्त महिलेची वर्षभरापासून पायपीट : प्लॉटचा ताबा मिळत नसल्याने संताप
– कुरखेडा महसूल विभागातील ढिसाळ कारभार उघड
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १० : नागरिकांची शासकीय सामूहिक व वैयक्तिक लाभाची कामे सुलभ व जलदगतीने व्हावीत, यासाठी महसूल विभागाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ योजनेअंतर्गत मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित केली जात आहेत. मात्र कुरखेडा तहसील कार्यालयातील जमीन शाखेत काही कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार व कामचुकार वृत्तीमुळे या उपक्रमाच्या उद्दिष्टालाच तडा जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहरातील सतीनदी काठावरील पूरग्रस्त कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन व्हावे, यासाठी काही वर्षांपूर्वी शासनाने शासकीय आबादी जागेत नाममात्र दरात प्लॉट उपलब्ध करून दिले होते. अनेक लाभार्थींनी शासकीय शुल्क भरून प्लॉटचा ताबा घेतला आहे. मात्र काही लाभार्थी विविध कारणांमुळे अद्याप ताबा घेऊ शकले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर आदिवासी समाजातील माया नीलकंठ आलाम या महिलेला त्यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने प्लॉट मंजूर करण्यात आला आहे. संबंधित प्लॉटचा ताबा मिळविण्यासाठी त्या मागील एक वर्षापासून तहसील कार्यालयातील जमीन शाखेत वारंवार फेऱ्या मारत आहेत. मात्र “प्रकरण सापडत नाही”, “हे माझे काम नाही” अशी उत्तरे देत सहाय्यक महसूल अधिकारी जुमनाके यांच्याकडून त्यांना वारंवार परत पाठवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान ९ मार्च रोजी शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे यांनी जमीन शाखेत जाऊन या प्रकरणाची चौकशी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर लाभार्थी माया आलाम यांनी तहसीलदार, कुरखेडा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी व पूरग्रस्त आदिवासी महिलेला प्लॉटचा ताबा देण्यात यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नगरसेवक आशिष काळे यांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #T20wordcoup #finalmatch #india #iran #ukren #rashia #america













