६ वर्षांनंतर पुन्हा धावली नागपूर बस ; कुरखेड्यात चालक-वाहकाचा सत्कार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०८ : कोरोना काळापासून बंद असलेली कुरखेडा–नागपूर थेट एसटी बस सेवा अखेर पुन्हा सुरू झाल्याने कुरखेडा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बहुप्रतिक्षित बस सेवेच्या पुनरारंभानिमित्त शहर विचार मंचाच्या पुढाकाराने कुरखेडा बसस्थानकावर बस चालक व वाहकाचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बसची पूजा करून चालक लक्ष्मण श्रीराव व वाहक रहाटे यांचा दुपट्टा, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तसेच पेढा भरवून सन्मान करण्यात आला.
मागील जवळपास सहा वर्षांपासून कोरची-कुरखेडा ते नागपूर ही महामंडळाची थेट बस सेवा बंद होती. कोरोना काळ संपल्यानंतरही सेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना नागपूरला जाण्यासाठी तुटक व त्रासदायक प्रवास करावा लागत होता. या समस्येबाबत शहर विचार मंचाने बसस्थानक प्रमुख श्रीधर शिवणकर यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला होता.
दरम्यान आमदार रामदास मसराम यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत कोरची-कुरखेडा ते नागपूर थेट बस सेवा सुरू करण्याची तसेच कुरखेडा येथे बस आगार उभारण्याची मागणी प्रभावीपणे मांडली होती. अखेर या प्रयत्नांना यश येत कोरची-नागपूर व कुरखेडा-नागपूर अशा दोन बस फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर शहर विचार मंचाने महामंडळ व आमदारांचे आभार व्यक्त करत बस चालक-वाहकाचा सत्कार केला.
या कार्यक्रमाला शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन नाट, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष राम लांजेवार, नगरसेवक अॅड. उमेश वालदे, डॉ. सतीश गोगुलवार, प्रा. किशोर खोपे, प्रा. डॉ. दशरथ आदे, डॉ. जगदीश बोरकर, केशव गुरनुले, राजेश उईके, सी. एल. डोंगरवार, पुंडलिक देशमुख, पुष्पराज रहांगडाले, ममता गिरडकर, योगिता मडावी, राजेश जेठानी, जावेद शेख, राकेश चव्हाण, सिराज पठाण, चेतन गहाने, नायब तहसीलदार रेखा बोके, श्यामराव सोनुळे तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













