अवैध दारूविरोधात संतप्त महिलांची कुरखेडा पोलीस उपविभागीय कार्यालयावर धडक

41

अवैध दारूविरोधात संतप्त महिलांची कुरखेडा पोलीस उपविभागीय कार्यालयावर धडक
– कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयावर हजारोंचा मोर्चा काढण्याचा इशारा
The गडविश्व
ता. प्र /कुरखेडा, दि. ०४ : तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुराडा, हेटी, वाघदरा, रामगड, जामटोला, कुंभीटोला व येडापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध व बनावट दारू विक्रीमुळे संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी युवती सेनेच्या नेतृत्वात कुरखेडा येथील पोलीस उपविभागीय कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
या भागात अवैध दारूची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. घरातील कर्ते पुरुष व्यसनाधीन झाल्याने महिलांवर अत्याचार, मारहाण आणि घरगुती कलहाचे प्रमाण वाढले आहे. बनावट दारूमुळे काहींच्या मृत्यू झाल्याचा आरोपही महिलांनी केला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली असल्याची वेदनादायक स्थिती त्यांनी मांडली.
यापूर्वी अनेकदा पुराडा पोलीस स्टेशनला निवेदने देऊनही तात्पुरती कारवाई होते मात्र काही दिवसांतच दारू विक्रेते पुन्हा सक्रिय होतात, अशी तक्रार महिलांनी व्यक्त केली. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून युवती सेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष प्रा. कु. उमाताई चंदेल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी थेट उपविभागीय पोलीस कार्यालय गाठले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले हे शासकीय कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांच्या प्रतिनिधी म्हणून कुरखेडा पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारले. यावेळी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत अवैध दारू विक्रेत्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, जर ठोस कारवाई झाली नाही तर हजारो महिलांसह गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रा. उमाताई चंदेल यांनी दिला.
या आंदोलनात अश्विनी पिंपळकर, सोनी गंगाचौधरी, देवकी सोनवाणी, सलेंद्री सोनवणे, शेवंता सहाळा, लता दखणे, जास्वंदा उसेंडी, जिजाबाई होळी, रसिका मडावी, शालू दरवडे यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here