‘मनरेगा बचाव’साठी कुरखेड्यात काँग्रेसचा एल्गार
– ग्रामीण मजुरांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १३ : ग्रामीण जनतेच्या जीवनाधार ठरलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) योजनेत प्रस्तावित बदलांच्या निषेधार्थ कुरखेडा येथे तालुका काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘मनरेगा बचाव’ अभियानाअंतर्गत शुक्रवारी फव्वारा चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
मनरेगा ही ग्रामीण कष्टकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांसाठी हमीचा रोजगार देणारी महत्त्वाची योजना असल्याचे सांगत, तिच्या नावात व स्वरूपात बदल करणे म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर घाला असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. हक्काचा रोजगार हिरावू देणार नाही, “मनरेगा पूर्ववत ठेवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाने केंद्राचा निर्णय जनविरोधी व शेतकरी-मजूरविरोधी असल्याचा आरोप करत, योजना पूर्वीप्रमाणेच देशभर राबवावी व ग्रामीण जनतेचा रोजगार अबाधित ठेवावा, अशी मागणी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
आंदोलनात तालुका व जिल्हा स्तरावरील काँग्रेस पदाधिकारी, महिला व युवक आघाडीचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कुरखेड्यातील या आंदोलनामुळे मनरेगा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामीण रोजगाराच्या सुरक्षेबाबतची चिंता स्पष्टपणे पुढे आली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews














