अहेरीत न.पं. ची ‘हातोडा’ कारवाई ; माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवारांची अनधिकृत इमारत जमीनदोस्त
The गडविश्व
अहेरी, दि. ०३ : न्यायालयीन आदेश आणि कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट होताच अहेरी नगरपंचायतीने मंगळवारी (०३) धडक कारवाई करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या मालकीची अनधिकृत इमारत बुलडोझरने पाडली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली असून, प्रशासनाच्या ‘हातोडा’ कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अहेरी–गडअहेरी राज्य महामार्गालगत उभारण्यात आलेले हे बांधकाम महामार्गापासून आवश्यक अंतर न ठेवता तसेच रस्त्याच्या हद्दीपासून सोडावयाची ४.५० मीटर जागा न ठेवता करण्यात आले होते. या कारणामुळे नगरपंचायतीने सुरुवातीलाच इमारतीचा नकाशा मंजूर करण्यास नकार दिला होता. तरीही प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरू ठेवण्यात आले.
नगरपंचायतीने यापूर्वी वारंवार नोटिसा बजावल्या तसेच पोलीस तक्रारही दाखल केली होती. त्यानंतरही बांधकाम न थांबल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. दीर्घ सुनावणीनंतर २९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने कंकडालवार यांच्या विरोधात निकाल दिला. वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपल्यानंतर कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट झाल्याने नगरपंचायतीने तातडीने कारवाईचे आदेश दिले.
या अनधिकृत बांधकाम प्रकरणाला स्थानिक राजकारणाची किनारही लाभली होती. विधानसभा निवडणुकीतील घडामोडी आणि विरोधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत होते.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अहेरी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. सकाळपासून बुलडोझरच्या साहाय्याने इमारत पाडण्यात आली. या कारवाईतून अनधिकृत बांधकामांविरोधात प्रशासनाने स्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Aheri #BulldozerAction
#IllegalConstruction #MunicipalAction #RuleOfLaw
#EncroachmentRemoval #LocalAdministration
#Gadchiroli #UrbanGovernance #LawAndOrder
zimbabwe vs netherlands, england vs sri lanka, india us trade deal, दिल्ली मौसम बारिश, beth mooney, sri lanka a vs oman














