धानोरा : निमगाव परिसरात अवैध रेती तस्करी, ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : तालुक्यातील निमगाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर महसूल विभागाने कठोर कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई रविवार, २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास करण्यात आली.
निमगाव परिसरात ट्रॅक्टरद्वारे बेकायदेशीर रेती उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची माहिती धानोरा तहसील प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने तातडीने कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेतला. सदर ट्रॅक्टर राजेंद्र सहारे, राहणार निमगाव यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर धानोरा तहसील कार्यालयाच्या परिसरात सुरक्षित ठेवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, महसूल सहाय्यक हितेश लांजेवार, महसूल सहाय्यक साईनाथ कुंभरे आदींच्या पथकाने केली.
अवैध रेती तस्करीमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अशा कारवायांमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













