आदिवासी अस्मितेचा उत्सव गडचिरोलीत ; अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत ‘कोया किंग अँड क्वीन’ स्पर्धा
– २८ व २९ जानेवारी ला आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : आदिवासी परंपरा, संस्कृती व अस्मितेचा गौरव करणारा भव्य ‘गडचिरोली ट्रायबल महोत्सव’ आणि राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी सांस्कृतिक स्पर्धा ‘कोया किंग अँड क्वीन’ प्रथमच गडचिरोली शहरात आयोजित करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सांस्कृतिक पर्वाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या दिव्यॉज फाऊंडेशन, मुंबईच्या संचालिका अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.के अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आज देण्यात आली.
हा दोन दिवसीय भव्य महोत्सव २८ व २९ जानेवारी २०२६ रोजी धानोरा मार्गावरील महाराजा सभागृहात पार पडणार असून, हिरा–सुका बहुउद्देशीय आदिवासी संस्था आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा व आंध्र प्रदेशातील आदिवासी कलाकार, स्पर्धक व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या महोत्सवातून आदिवासी जीवनशैली, लोकनृत्य, पारंपरिक गीत, वेशभूषा, हस्तकला, खाद्यसंस्कृती व रितीरिवाजांचे भव्य दर्शन नागरिकांना अनुभवता येणार आहे. देशभरातील आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वैविध्याची ओळख निर्माण करणे व आदिवासी परंपरांचे जतन-संवर्धन करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान बुधवार २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. सकाळी ११ वाजता अमृता फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून यानंतर एकल आदिवासी गीतगायन स्पर्धा तसेच समूह आदिवासी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
गुरुवार २९ जानेवारी रोजी देशभरातून आलेल्या स्पर्धकांचे आगमन होणार असून, दुपारी २ वाजता मान्यवर व विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धांना सुरुवात होणार आहे. सायंकाळी ७ वाजता पारितोषिक वितरण समारंभ, तर रात्री १० वाजता महोत्सवाचा समारोप होणार आहे.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की ही स्पर्धा पूर्णतः निःशुल्क असून स्पर्धकांकडून कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. तसेच स्पर्धक व त्यांच्यासोबत एका पालकासाठी राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. आदिवासी हस्तकला वस्तू, पारंपरिक साहित्य व खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येणार असून, यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या कला-कौशल्यातून आर्थिक उत्पन्नाची संधी मिळणार आहे.
ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून आदिवासी संस्कृतीचा उत्सव ठरणार आहे. विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय स्तरावरील असा आदिवासी सांस्कृतिक जनसागर उसळणार असून, या महोत्सवामुळे जिल्ह्याची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, कोषाध्यक्ष जाहिदा शेख, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार आदी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी 9405207739, तसेच आदिवासी साहित्य विक्रीसाठी मोफत स्टॉल नोंदणीसाठी 9423598614 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













