कोरची : थंडीच्या लाटेत गरजूंना ‘मायेची उब’

69

कोरची : थंडीच्या लाटेत गरजूंना ‘मायेची उब’
– ब्लँकेट वितरण मोहिमेचा उत्साहात प्रारंभ
The गडविश्व
ता. प्र/ कोरची, दि.०२ : कडाक्याच्या थंडीने हैराण झालेल्या दुर्गम भागातील गरजू कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपवन संस्था व स्वाभिमान फाउंडेशन, कोरची यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायेची उब’ ब्लँकेट वितरण मोहीम २०२५–२६ चा शुभारंभ आज करण्यात आला. तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या प्रमुख उपस्थितीत मौजा पडियालजोब येथील तहसील कार्यालयात, छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानांतर्गत या सामाजिक उपक्रमाला सुरुवात झाली.
गतवर्षी नागपूर, पुणे, मुंबईसह विविध ठिकाणांहून दानकर्त्यांच्या उदार सहकार्याने अनेक गरजू कुटुंबांपर्यंत ब्लँकेट पोहोचविण्यात आली होती. त्या सर्व दानकर्त्यांचे यावेळी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. यंदाही थंडीच्या वाढत्या प्रादुर्भावात गरजू बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी दानकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने पुढाकार घेतला असून, त्यांच्या भरघोस सहकार्यामुळे मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे.
कार्यक्रमास नायब तहसीलदार ज्योती गोंधळे, निरीक्षण अधिकारी अशोक कुथे, ग्रामसभा अध्यक्ष राजाराम नैताम, उपकृषी अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे, स्वाभिमान फाउंडेशनचे संस्थापक अविनाश हुमणे, सहसचिव अंकुश हुमणे, तेजस गोठे यांच्यासह पडियालजोब, मुरकुटी, मयालघाट व डाबरी परिसरातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील अनाथ, अपंग, वयोवृद्ध तसेच अत्यंत गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करून त्यांना थंडीपासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वाभिमान फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, दानकर्ते, प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
सामूहिक सहकार्याच्या बळावर राबविण्यात येत असलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, थंडीच्या दिवसांत गरजूंना खऱ्या अर्थाने ‘मायेची उब’ देणारा ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here