नववर्षाची भेट : नक्षलपीडित कुटुंबांना स्थैर्य, २९ जणांना शासकीय नियुक्ती
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : नक्षलवादामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या जीवनात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्थैर्य आणि आशेचा नवा प्रकाश उमटला आहे. नक्षलपीडित कुटुंबांच्या पुनर्वसन व सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अशा कुटुंबांतील २९ तरुणांना शासनसेवेत सामावून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत शिपाई पदावर नियुक्तीपत्रांचे वितरण केले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी हिंसाचारात गोपनीय माहितीदारांची हत्या झालेल्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णयान्वये एका सदस्याला शासकीय सेवेत संधी देण्याची तरतूद आहे. मात्र, दीर्घकाळ रिक्त पदांचा अभाव ही अडचण ठरत होती. ही अडचण दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्यपूर्ण पाठपुरावा करत जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्वी निरसीत करण्यात आलेली २९ शिपाई संवर्गाची पदे पुनर्जीवित करून घेतली.
या प्रशासकीय प्रयत्नांचे फलित म्हणून १ जानेवारी २०२६ रोजी नक्षलपीडित कुटुंबांतील २९ उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते या नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, ही संधी केवळ रोजगारापुरती मर्यादित नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून कार्य करण्याची मोठी संधी आहे. सेवेत कार्यरत असताना नियमांचे काटेकोर पालन, जनतेप्रती संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता या मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच, सेवेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण प्रशासनामार्फत देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे, आस्थापना शाखेचे तहसीलदार सचिन जयस्वाल तसेच नवनियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #NaxalAffected #Rehabilitation #GovernmentJobs #EmploymentNews #DistrictAdministration #SocialJustice #NewYearRelief #PublicService













