रांगी–जांभळी मार्गावरील अर्धवट पुलाचे काम सुरू न झाल्यास 26 जानेवारीपासून उपोषण
– जांभळी ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०१ : भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला असला, तरी आरमोरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जांभळी, दवंडी व परिसरातील नागरिकांना आजही मूलभूत रस्ते-सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रांगी–जांभळी मार्गावरील नाळेवाही नाल्यावर अर्धवट अवस्थेत असलेले पुलाचे बांधकाम तातडीने सुरू न झाल्यास २६ जानेवारी २०२६ पासून नाळेवाही नाल्यावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जांभळी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जांभळी येथील नाळेवाही नाल्यावर पूल उभारणीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ‘आज नाही तर उद्या काम सुरू होईल’ या आशेवर गावकरी वाट पाहत असतानाच वर्षानुवर्षे केवळ आश्वासनांचीच पुनरावृत्ती होत आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच लोकप्रतिनिधी- आमदार व खासदार यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही, असा उल्लेख २२ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
जांभळी हे आरमोरी तालुक्यातील शेवटचे गाव असून रांगी रस्त्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर नाळेवाही नाला आहे. या नाल्यावरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे जांभळी, दवंडी येथील नागरिकांना रांगी येथील आठवडी बाजार, बँक व्यवहार तसेच गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयीन कामांसाठी जीव धोक्यात घालून नाल्यातून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात नाल्याला येणाऱ्या पुरामुळे हा प्रवास अधिकच धोकादायक ठरत असून मागील १५ वर्षांपासून गावकरी हा त्रास सहन करत आहेत.
प्रशासन व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून उपोषणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत २६ जानेवारी २०२६ पासून सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आली आहे.
जांभळी ही गट ग्रामपंचायत असून तिच्या अंतर्गत दवंडी, जांभळी, माझीटोला, शिवटोला, ताडमटोला, टेकामटोला, पाटीलटोला व आशा असे एकूण सहा टोले येतात. नाळेवाही पुलाअभावी रात्री-अपरात्री प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणी व नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नाळेवाही पुलाच्या संदर्भात ग्रामसभेत ठराव घेऊन पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच क्षेत्रातील आमदार व खासदार यांना निवेदने सादर करण्यात आली आहेत. तरीही शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन पुलाचे बांधकाम सुरू करावे, अन्यथा उपोषण अटळ असल्याचा इशारा सरपंच मणिराम पदा, ग्रामपंचायत सदस्य अनुसया ताडाम, रागिनी उसेंडी, आसाराम ताडाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष बारीकराव उसेंडी, तसेच रामचंद्र टेकाम, निरंगशहा हलामी, रामदास उसेंडी, मधुकर उसेंडी यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी दिला आहे.













