धानोरा येथे सिकलसेल तपासणी व UDID कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता. प्र / धानोरा , दि. ३१ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धानोरा तालुक्यातील सिकलसेलग्रस्त व दिव्यांग नागरिकांसाठी आजाराचे निदान व UDID कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय, धानोरा येथे मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी विशेष सिकलसेल आरोग्य तपासणी व UDID कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले.
या शिबिराचे आयोजन पंचायत समिती धानोरा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय धानोरा तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटना धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिबिरात सिकलसेल आजाराची तपासणी, आवश्यक रक्तचाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला तसेच पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची UDID कार्डसाठी नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
शिबिरात एकूण १४४ सिकलसेल (SS पॅटर्न) रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच पात्र लाभार्थ्यांच्या UDID कार्ड निर्मितीसाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली. ग्रामीण भागातील अधिकाधिक गरजू नागरिकांना शिबिराचा लाभ मिळावा यासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामसेवकांनी रुग्ण व लाभार्थ्यांची ने-आण करण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
जिल्हास्तरावरून आलेले तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी भिषक डॉ. सचिन कवाडकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. मुकेश अत्यालडगे यांनी रुग्णांची सखोल तपासणी केली. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले, अनुप्रिया आत्राम (पर्यवेक्षक-समुपदेशक) यांच्यासह तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमामुळे सिकलसेल आजाराबाबत ग्रामीण भागात जनजागृती वाढण्यास मोठी मदत झाली असून, दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या UDID कार्ड मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. प्रशासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गट विकास अधिकारी एस. वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज हेमके यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.













