चकमकीत १ कोटींचा इनामी CCM गणेश उईकेसह ६ नक्षलवादी ठार

128

चकमकीत १ कोटींचा इनामी CCM गणेश उईकेसह ६ नक्षलवादी ठार
– घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त,
The गडविश्व
कंधमाल (ओडिशा) / विशेष प्रतिनिधी, दि. २५ : सुरक्षाबलांनी छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात निर्णायक कारवाई करत चकमकीत ६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्यांमध्ये माओवादी संघटनेचा सेंट्रल कमिटी मेंबर (CCM) तथा १ कोटी रुपयांहून अधिक इनामी गणेश उईके याचा समावेश असून दोन महिला नक्षलवादीही ठार झाल्या आहेत. या कारवाईमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
कंधमाल जिल्ह्यातील चाकापाडा परिसरात नक्षलवाद्यांची उपस्थिती असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षाबलांनी २३ पथकांचे संयुक्त अभियान राबविले. या मोहिमेत २० स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG), दोन सीआरपीएफ आणि एक बीएसएफ पथक सहभागी होते. चाकापाडा पोलीस ठाणे हद्दीत तसेच गंजाम जिल्ह्यातील राम्भा जंगल परिसरात ही कारवाई सुरू होती.
२५ डिसेंबर रोजी अभियानादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद्यांनी गोळीबार केल्याने जोरदार चकमक झाली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षाबलांनी प्रभावी कारवाई केली. चकमकीनंतर राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये प्रथम पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले, तर पुढील शोधात आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. ठार झालेल्यांमध्ये तीन पुरुष व दोन महिला नक्षलवादी असून सर्वजण माओवादी वर्दीत होते.
घटनास्थळावरून दोन इन्सास रायफल्स आणि एक .३०३ रायफल जप्त करण्यात आली आहे. परिसरात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू असून ओडिशा–छत्तीसगड सीमावर्ती भागातील माओवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी सुरक्षाबळे सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #SecurityForces #AntiNaxalOperation #NaxalEncounter
#CCMGaneshUike #Kandhamal #Odisha #MaoistDown #CounterInsurgency #SOG #CRPF
#BSF #InternalSecurity

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here