रांगी परिसरात वाघिणीचा धुमाकूळ ; गायीचा बळी

74

रांगी परिसरात वाघिणीचा धुमाकूळ ; गायीचा बळी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : धानोरा तालुक्यातील रांगी–खारडी–वनखेडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघिणीचा वावर वाढला असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांगी येथील एका शेतकऱ्याच्या गायीला वाघिणीने ठार केल्याची घटना मंगळवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास रांगी–कोरेगाव रस्त्यावर घडली.
रांगी येथील गणपत नागोजी कुंभरे यांच्या मालकीची गाय वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाली. रांगी उपक्षेत्रातील नियत क्षेत्र, कक्ष क्रमांक ६०६ मधील जंगलात ही घटना घडल्याने संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी रोहन पाटील व मंगेश पावल (धानोरा), क्षेत्र सहाय्यक केशव ढवळे तसेच वनरक्षक रोशनी तुंकलवार यांनी घटनास्थळी भेट देत सायंकाळी ४.४५ वाजता पंचनामा केला. नुकसान भरपाईसाठी आवश्यक प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रांगी परिसरात वाघिणीचा दोन बछड्यांसह वावर असल्याचे कॅमेऱ्याद्वारे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. कोणीही जंगलात एकटे जाऊ नये, आवश्यक असल्यास गटानेच जावे, मोबाईलवर गाणे वाजवीत चालावे तसेच शक्यतो जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन रांगी येथील राऊंड ऑफिसर ढवळे यांनी केले आहे.
वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वन विभागाने गस्त वाढवून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here