उद्या गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थे’चे उद्घाटन

70

उद्या गोंडवाना विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थे’चे उद्घाटन
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली दि. २६ : गोंडवाना विद्यापीठ आणि मेसर्स लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ गडचिरोली या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन उद्या, शुक्रवार २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते जिल्हा मुख्यालयालगतच्या अडपल्ली येथे होणार आहे.
या उद्घाटन समारंभास वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे तसेच लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह आमदार अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, धर्मरावबाबा आत्राम, किर्तीकुमार भांगडीया, किशोर जोरगेवार, रामदास मसराम, देवराव भोंगळे, करण देवतळे, डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि.चे लेफ्टनंट कर्नल विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक हिंम्मतसिंग बेदला, तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित राहणार आहेत.
विशेष म्हणजे, या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणाची संधी मिळणार असून, गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्यातील गुणवंत व होतकरू युवकांसाठी हे तंत्रज्ञान शिक्षणातील मैलाचा दगड ठरणार आहे.
यावेळी युथ पॅरा गेम्स दुबई स्पर्धेतील विजेती श्वेता कोवे हिचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
उद्या होणाऱ्या या भव्य उद्घाटन समारंभाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण आणि न.न.व.सा. संचालक तथा युआयटी प्रभारी संचालक प्रा. मनिष उत्तरवार यांनी केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here