जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या नेतृत्वाखाली लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी
– ४८ नोंदणीकृतांपैकी २८ महिलांवर अत्याधुनिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) पद्धतीने स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभावी नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४८ नोंदणीकृत महिलांपैकी २८ महिलांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.
ग्रामीण व आदिवासी भागातील माता व बाल आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या विशेष शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधून आलेल्या महिला रुग्णांचा सहभाग होता.
या नाविन्यपूर्ण शिबिराचे उद्घाटन बुधवारी सकाळी ९ वाजता डॉ. वर्षा एस. लहाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. लॅप्रोस्कोपी ही बिनटाका, अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धत असून यामध्ये रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना होतात, त्या लवकर बऱ्या होतात तसेच केवळ दोन दिवसांत रुग्णालयातून सुट्टी मिळते. त्यामुळे महिलांना सुरक्षित व सोयीस्कर उपचार मिळत असून ही पद्धत शिबिराचे प्रमुख आकर्षण ठरली.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने मोलाचे योगदान दिले. यामध्ये महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत बद्देला, डॉ. हिना उंदीरवाडे, शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापूरे, डॉ. नागसेन साखरे, डॉ. मित्तल गेडाम तसेच भूलतज्ज्ञ डॉ. हेमंतकुमार मडावी यांचा समावेश होता. परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा एस. लहाडे यांनी सांगितले की, “ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांनाही आधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा शिबिरांमुळे महिलांना सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय उपलब्ध होत असून, भविष्यातही ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर अशा विशेष शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolipolice














