डोंबिवलीत दिवाळी निमित्ताने ‘किल्ले दुर्गाडी’ची आकर्षक प्रतिकृती

98

डोंबिवलीत दिवाळी निमित्ताने ‘किल्ले दुर्गाडी’ची आकर्षक प्रतिकृती
– स्वराज्याच्या आरमाराचा संदेश देणारी कलाकृती
The गडविश्व
डोंबिवली, दि.२९ : दिवाळीच्या शुभ पर्वावर डोंबिवली (पूर्व) येथील बाळ गोपाळ उत्सव मंडळ, मढवी शाळा यांच्या वतीने ऐतिहासिक किल्ले दुर्गाडीची देखणी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या निर्मितीत मंडळातील मावळे साहिल मुंढे, प्रशांत मेस्त्री, सक्षम जाधव, विघ्नेश चव्हाण, सुशांत मुंढे, ओबेदुल्ला शेख, राहुल पांचाळ, अक्षय सावंत, गौरव साळवी, हितेश कटारे, हेरंब लांजवळ, कुणाल जाधव आदी सदस्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
सदर प्रतिकृतीमागील उद्दिष्ट केवळ कलात्मक नसून सामाजिक जाणिवेचे द्योतक आहे. मंडळाच्या मते, किल्ले दुर्गाडी हे स्वराज्याचे पहिले आरमार असले तरी आज ते शासनाच्या दुर्लक्षामुळे जतनाविना उभे आहे. याच मुद्द्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न मंडळाने या माध्यमातून केला आहे.किल्ल्या लगत असलेले उल्हास नदीचे पात्र हे ठाणे, मुंबई व वसईला जोडणारे असून, या खाडीतून जलवाहतूक सुरू केल्यास कल्याण-डोंबिवली परिसरातील सेंट्रल रेल्वेवरील ताण कमी होऊ शकतो. यामुळे वाहतूक व्यवस्थेला पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकेल, असे मंडळाने नमूद केले आहे.
मंडळाचे कार्यकर्ते म्हणाले, “किल्ले दुर्गाडी ही फक्त ऐतिहासिक वास्तू नसून महाराजांच्या शासनकारभारातील दूरदृष्टीचे प्रतीक आहे. त्या दूरदृष्टीचा वापर आजच्या काळात करून विकासाचा नवा अध्याय लिहिता येऊ शकतो.”
दिवाळीच्या उत्साहात साकारलेली ही कलाकृती इतिहासाचा सन्मान आणि भविष्याचा विचार यांचे सुंदर मिश्रण ठरत असून, स्थानिक नागरिकांकडून तिचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here