– जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाची कहाणी – दोन वेळा तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत यश
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. २७ : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वात दुर्गम भागातल्या गुटेकसा या छोट्याशा गावातून आपल्या जिद्द, चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर राज्यभरात नाव कमावणारी मंगला शेंडे आज सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे. तब्बल दोन वेळा तालुका क्रीडा अधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून तिने इतिहास रचला असून तिच्या कामगिरीचा कोरची तालुक्याला अभिमान आहे.
मंगला शेंडेचे प्राथमिक शिक्षण कोरची येथील शासकीय आश्रमशाळेत झाले. पाचवीत असतानाच वडिलांचे निधन झाल्याने आयुष्याची लढाई बालवयातच सुरू झाली. मात्र परिस्थितीशी दोन हात करत तिने खेळाच्या माध्यमातून स्वतःचा मार्ग तयार केला. सहावी ते नववीचे शिक्षण तिने अमरावती येथील क्रीडा प्रबोधिनीत घेतले.
१९९६ साली महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीसाठी झालेल्या फिटनेस व वैद्यकीय चाचणीत ३६० विद्यार्थ्यांपैकी केवळ ३६ जणांची निवड झाली आणि त्यामध्ये मंगला ही एकमेव मुलगी होती. त्यानंतर तिने एम.ए. (मराठी व मानसशास्त्र), बी.पी.एड., एम.पी.एड., एम.फिल. पर्यंतचे शिक्षण स्वतः नोकरी करत पूर्ण केले असून सध्या ती पीएच.डी. करत आहे.
१९९६ ते २००८ दरम्यान तिने ज्युडो खेळात तब्बल १६ राष्ट्रीय स्पर्धांत भाग घेतला आहे. त्यात ३ सुवर्ण, २ रौप्य आणि ८ कांस्य पदकांची कमाई करत १९ वेळा राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले आहे. पाच वेळा ‘उत्कृष्ट ज्युडोपटू’ म्हणून सन्मानित झालेली मंगला ही ब्लॅक बेल्टधारक असून महाराष्ट्र राज्याच्या ज्युडो रेफरी म्हणूनही कार्यरत आहे.
२००९ साली गडचिरोली जिल्हा क्रीडा पुरस्काराने तिचा सन्मान झाला. ज्युडोपलीकडेही तिने कुस्ती आणि ॲथलेटिक्स (१०० मी. धावणे) मध्ये राज्यस्तरीय सहभाग नोंदवला आहे. २००१ साली जपान (फुकुओका) येथे होणाऱ्या वरिष्ठ आंतरराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती; मात्र व्हिसा न मिळाल्याने सहभाग शक्य झाला नाही, ही तिच्या आयुष्यातील एक खंत ती आजही व्यक्त करते.
२०१२ पासून ती पुण्यातील श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होती, तर सध्या ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
तिच्या यशानंतर कोरची व गुटेकसा परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. कोरची येथून गुटेकसा पर्यंत नागरिकांनी प्रभात फेरी काढत तिचा भव्य सत्कार केला. कोरची बाजार चौक व गुटेकसा येथे झालेल्या सत्कार समारंभात पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक ठाकरे म्हणाले, “मंगला शेंडेचा संघर्ष आणि यश हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. जिद्दीने प्रयत्न केले तर कोणतेही ध्येय गाठता येते.” तर स्वतः मंगला शेंडे म्हणाली, “परिस्थिती कितीही कठीण असो, खचू नका; प्रयत्न करत राहा, यश नक्की मिळेल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchinews














