गडचिरोली : रेकी करीत असलेल्या नक्षल समर्थकास अटक

190

गडचिरोली : रेकी करीत असलेल्या नक्षल समर्थकास अटक
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरक्षा दलातील जवानांची रेकी करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.
पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी भामरागड परिसरात माओवादविरोधी अभियान राबवित असताना गुप्त माहितीच्या आधारे पोलीस व सिआरपीएफच्या जवानांनी संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणण्यात आले. सखोल चौकशीत त्याची ओळख सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (वय ३८, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) असे पटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर सैनु हा कट्टर नक्षल समर्थक असून त्याचा २७ ऑगस्ट २०२५ रोजी कोपर्शी-फुलनार जंगल परिसरातील पोलिस-माओवादी चकमकीत सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाले असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान याच अनुषंगाने पोस्टे कोठी येथे दाखल अप. क्र. ०२/२०२५ अंतर्गत त्याला ३० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. सध्या त्याचा इतर विध्वंसक कारवायांमध्ये सहभाग असल्याची पडताळणी सुरू आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, कमांडंट 37 बटा. सिआरपीएफ दाओ इंजिरकान कींडो, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भामरागड, इंट सेल प्राणहिता व सिआरपीएफचे अधिकारी व जवान यांनी पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, पुन्हा एकदा माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण ११० माओवादी अटकेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here