१७ लाख कोटींची कर्जमाफी उद्योगपतींना, शेतकरी मात्र उघड्यावर – बच्चू कडू

160

१७ लाख कोटींची कर्जमाफी उद्योगपतींना, शेतकरी मात्र उघड्यावर – बच्चू कडू
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : “देशातील उद्योगपतींची तब्बल १७ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ करून सरकारने त्यांना मेहेरबानी दाखवली, मात्र शेतकऱ्यांच्या छोट्याशा कर्जासाठी सरकार तगादा लावते. शेतकऱ्यांना न्याय न देणारे हे सरकार उद्योगपतींचे सरकार झाले आहे,” असा घणाघात प्रहार संघटनेचे संस्थापक व शेतकरी नेते बच्चू कडू यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केला.
कडू म्हणाले, “पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांची आधारभूत किमतीच्या नावाखाली सातत्याने फसवणूक होत आहे. दरवर्षी हेक्टरी १६ हजारांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. मात्र सरकार व्यापारी कंपन्यांना प्रचंड अनुदाने व सवलती देऊन त्यांना वरचढ ठरवत आहे. रिलायन्ससारख्या कंपनीचे तब्बल ४८ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. हे उद्योगपती देशातील सर्वसामान्य जनतेची लूट करत आहेत आणि सत्ताधारी त्यातूनच आपले खिसे भरत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “जनतेला खरे प्रश्न विचारू नयेत म्हणून धर्म-जातीच्या भांडणात गुंतवून ठेवले जाते. नुकतेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी भाडेतत्त्वावर देण्याचा कायदा करण्याची घोषणा केली. यावरून आदिवासींमध्ये तीव्र रोष आहे. गडचिरोलीत मोठे उद्योग उभारले जात आहेत, मात्र स्थानिकांना रोजगार किती मिळाला याची चौकशी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांवर कायद्याचा धाक दाखवला जातो, तर खासगी कंपन्यांना त्यालाच बगल दिली जाते. हे सरकार इंग्रजांपेक्षा जास्त जुलमी आहे; इंग्रजच बरे होते.”
राज्यभर दौरे करून शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा निर्धार व्यक्त करताना कडू यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान गडचिरोली ते नागपूर पदयात्रा काढण्याची घोषणा केली.
दरम्यान, जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या प्रश्नावर त्यांनी वनविभाग व सरकारवर जोरदार टीका केली. “हत्ती उभे पीक नष्ट करत आहेत. नुकसान भरपाईच्या नावाखाली सरकार तुटपुंजी रक्कम देते. ही भरपाई नसून भीक आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान दामदुप्पट देणे हीच खरी न्याय्य भरपाई ठरेल,” अशी मागणी कडू यांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here