नवरात्रीत गडचिरोलीतील मटण मार्केट राहणार बंद

77

नवरात्रीत गडचिरोलीतील मटण मार्केट राहणार बंद
– हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली शहरात नवरात्री उत्सवाला यंदा धार्मिकतेसोबतच सामाजिक ऐक्याची अनोखी जोड मिळाली आहे. शहरातील सर्व मटण व चिकन मार्केट घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून या उपक्रमाला हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी सुरू झालेली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. विशेष म्हणजे, शहरातील मुस्लिम बांधवांनी स्वखुशीने सहकार्य करत एकतेचे आणि बंधुभावाचे अप्रतिम उदाहरण घालून दिले आहे.
या निर्णयाविषयी उदय धकाते म्हणाले, “नवरात्री हा शुद्धता, मातृशक्तीची उपासना आणि समाजातील एकतेचा उत्सव आहे. या पवित्र काळात मांस विक्री बंद ठेवणे म्हणजे केवळ धार्मिक परंपरा जपणे नव्हे, तर एकोपा आणि परस्पर आदराचे मूल्य रुजवणे होय. हिंदू-मुस्लिम बंधूंचे मिळालेले सहकार्य हे गडचिरोलीच्या सौहार्दपूर्ण संस्कृतीचे खरे दर्शन आहे.”
दरम्यान, कारगिल चौकात दुर्गामातांची स्थापना करून विधिवत पूजा-अर्चा सुरू असून महिला मंडळांच्या वतीने पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर नवरात्रोत्सवाच्या उत्साहाने उजळून निघाला आहे.
शहरात कुठेही मांस विक्री सुरू असल्यास त्या भागातील दुर्गा व शारदा मंडळांनी दुकाने बंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही धकाते यांनी केले आहे.
गडचिरोलीकरांच्या या सामूहिक निर्णयाने नवरात्री उत्सवाला धार्मिकतेसोबत सामाजिक बंधुभावाचा उज्ज्वल संदेश लाभला आहे.
#thegadvishva #thegdv #gadchirolipolice #gadchirolinews #Gadchiroli #Navratri2025 #HinduMuslimUnity #MuttonMarketClosed #SocialHarmony #DurgaUtsav #ReligiousUnity #FestivalNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here