चाकोरीबाहेरील मैत्रीणी : पनवेलमध्ये उद्या स्त्रीशक्तीचा भव्य गौरवसोहळा

121

The गडविश्व
नवी मुंबई, दि. १९ : घराच्या चौकटी मोडून स्वतःचा मार्ग निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा भव्य सन्मान करण्यासाठी मनमुक्त फाऊंडेशन तर्फे ‘चाकोरीबाहेरील मैत्रीणी – कृतज्ञता सोहळा’ हा ऐतिहासिक उपक्रम शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता सुरुची हॉल, पनवेल येथे आयोजित करण्यात येत आहे.
या विशेष सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत कार्यरत ५० कर्तृत्वशाली महिलांचा सामूहिक गौरव होणार असून, घरगुती जबाबदाऱ्या, परंपरागत बंधने आणि सामाजिक मर्यादा यांवर मात करून स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या महिलांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विशेष उल्लेखनीय दहा सन्मानार्थींमध्ये मनीषा यादव, अनिता कोलते, गीता जुन्नरकर-राऊत, प्रतीक्षा वाडे, सुचित्रा घोगरे-काटकर, नेहा दाबके, स्मिता गायकवाड, सुरेखा काटकर, संध्या गायकवाड आणि देवयानी गोविंदवार यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला राज्यातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये मनीषा वर्मा (अपर मुख्य सचिव, प्रशासकीय नाविन्यता व सुशासन विभाग), अंजली ढमाळ (उपसंचालक, मराठी भाषा विभाग), डॉ. वैशाली पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व संचालिका, अंकुर ट्रस्ट) आणि ललिता बाबर (उपआयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका) या मान्यवरांचा समावेश आहे.
मनमुक्त फाऊंडेशनने स्थापनेपासून मानसिक आरोग्य संवर्धन, विधवा व परित्यक्ता महिलांचे पुनर्वसन, युवक व्यक्तिमत्व विकास, अनाथ मुलांचे शिक्षण आणि ज्येष्ठांचा सन्मान अशा विविध क्षेत्रांत मोलाचे कार्य केले आहे. “व्यक्त व्हा, रिक्त व्हा, मुक्त व्हा” या ध्येयवाक्याने सुरू झालेली ही चळवळ समाजातील उपेक्षित घटकांना नवी दिशा देत आहे.
“हा सन्मान म्हणजे स्त्रीच्या संघर्षातील अश्रूंना, ओठांवरील हास्याला आणि समाजासाठी केलेल्या योगदानाला आदरांजली आहे,” असे मनमुक्त फाऊंडेशनने स्पष्ट केले.
पनवेल शहर २० सप्टेंबर रोजी या प्रेरणादायी सोहळ्याचा साक्षीदार ठरणार असून, स्त्रीशक्तीचा गौरव प्रत्येक कुटुंबाला अभिमान आणि आत्मविश्वासाची नवी दिशा देईल.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #thegadvishva #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here