The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) या विशेष उपक्रमाचा शुभारंभ कुरखेडा तालुक्यात झाला. नगर पंचायत येथे झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या प्रसंगी तहसीलदार राहुल पाटील, नायब तहसीलदार राजकुमार धनबाते व आंबेकर, नगराध्यक्ष अनिता बोरकर, उपाध्यक्ष बबलू भाई हुसैनी, तसेच ग्राम महसूस अधिकारी ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान रस्त्यांची नोंद नकाशावर घेणे, पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, अस्तित्वात असलेल्या परंतु नोंद नसलेल्या मार्गांचा समावेश करणे, इयत्ता १०वी ते १२वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वाटप, तसेच लक्ष्मी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
ग्रामसभेत नागरिकांच्या समस्या ऐकून तात्काळ निराकरणाचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष अनिता बोरकर यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्थांना सक्रिय सहभागाचे आवाहन केले. तर तहसीलदार पाटील यांनी “सेवा पंधरवड्यादरम्यान शिबिरे, दाखले वितरण व जनजागृती उपक्रम राबवले जाणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा” असे आवाहन केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे कुरखेडा तालुक्यातील विकासकामांना गती मिळणार असून, शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचण्यास चालना मिळाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews













