कोरची तालुका हादरला : जंगलात पत्नीचा गळा दाबून खून

1547

– दारूच्या नशेत पतीची कबुली
The गडविश्व
गडचिरोली- कुरखेडा, दि. ६ : कोरची तालुक्यातील कोटगुल पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सोनपूर गावाजवळील जंगल परिसरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालणाऱ्या पतीने अखेर टोकाचे पाऊल उचलत पत्नीचा जीव घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कोरची तालुका या घटनेने हादरला आहे.
मृत महिलेचे नाव टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम (३४) असे असून, आरोपी पतीचे नाव पुरुषोत्तम गजराज कचलाम (३४, रा. सोनपूर) आहे. दहा वर्षांपूर्वी या दाम्पत्याचा विवाह झाला होता. त्यांना नऊ व पाच वर्षांची दोन लहान मुले असून, आईच्या मृत्यूमुळे या निष्पाप मुलांवर दुःखाचे सावट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुरुषोत्तम हा स्वभावाने चिडचिडा व संशयी असून, तो पत्नीच्या चारित्र्यावर सतत शंका घेत असे. ३१ ऑगस्ट रोजी दोघांमध्ये झालेल्या वादानंतर १ सप्टेंबर रोजी त्याने पत्नीला माहेरी सोडण्याच्या बहाण्याने पायी नेले. सोनपूर-कोटगुल दरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पोहोचल्यावर पुन्हा वाद पेटला आणि संतप्त पतीने पत्नीला जमिनीवर पाडून तिच्या छातीवर बसत गळा दाबून खून केला.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी गावात परतला आणि दारूच्या नशेतच गावकऱ्यांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. गावकऱ्यांनी मृतकाची आई चमरीबाई बोगा (रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड) यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ३ सप्टेंबर रोजी कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात हलवला. आरोपीस सोनपूर येथील शेतातून अटक करण्यात आली असून, त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून, दारूच्या नशेतून आणि घरगुती हिंसाचारातून घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kotgul #korchi #Gadchiroli #CrimeNews #MurderCase #DomesticViolence #GadchiroliPolice #MaharashtraNews #BreakingNews #गडचिरोली #गुन्हेवार्ता #खून #घरगुतीहिंसाचार #गावखळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here