– स्थानिक खाद्यसंस्कृती व पौष्टिक आहार संवर्धनासाठी उपक्रम , शेतकरी व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ३० : ग्रामीण खाद्यसंस्कृतीचे संवर्धन आणि रानभाज्यांच्या पौष्टिकतेबाबत जनजागृती करण्यासाठी कुरखेडा येथे ‘रानभाजी २०२५ महोत्सव’ दणक्यात साजरा करण्यात आला. तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात झाले.
महोत्सवात शेतकरी, महिला बचत गट तसेच कृषी क्षेत्रातील घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन साकारले. उद्घाटनप्रसंगी आमदार मसराम यांनी सांगितले की, “रानभाज्या या केवळ परंपरागत खाद्यसंस्कृतीचे प्रतीक नसून त्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळते व स्थानिक कृषी उत्पादनांचे जतन होते.”
या कार्यक्रमाला माजी जि.प. उपाध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी सभापती परसरामजी टिकले, तहसीलदार पाटील, तालुका कृषी अधिकारी रुपाली जाधव, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे, प्रकल्प संचालक अर्चना कोचरे, माजी नगरसेवक उस्मान पठाण, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रांजल धाबेकर यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महोत्सवात रानभाज्यांचे महत्त्व, त्यांचा दैनंदिन आहारातील वापर, साठवण तंत्रज्ञान आणि त्यातून होणारे आरोग्यदायी फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शेतकरी–महिला गटांचा सहभाग पाहता हा उपक्रम ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी आणि आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













