धानोरा : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची गट साधना केंद्र व बांधकाम विभागाला अचानक भेट

161

– त्रुटींवर सुधारणा करण्याच्या सूचना
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या गट साधना केंद्रासह जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामकाजातील त्रुटी, स्वच्छतेतील उणीवा आणि कर्मचाऱ्यांच्या ताळमेळातील कमतरता आमदारांच्या निदर्शनास आल्या.
गट साधना केंद्राच्या पाहणीत नियोजनातील कमतरता, स्वच्छतागृह व साठवणूक खोलीच्या अपुऱ्या देखभालीबरोबरच स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे उघड झाले. या सर्व बाबींवर तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून लवकरच सुधारित कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी पुन्हा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग धानोरा कार्यालयातही आमदार नरोटे यांनी हजेरी नोंदणी तपासून कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाहिली. कार्यालयीन शिस्त काटेकोरपणे पाळली जावी, जनतेच्या कामात अडथळा येऊ नये, तसेच सर्व शासकीय कामकाज पारदर्शक आणि कार्यक्षमतेने पार पडावे, यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
“जनतेच्या प्रश्नांचा तातडीने निपटारा व्हावा आणि नागरिकांना योग्य सेवा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे,” असे आमदार नरोटे यांनी यावेळी सांगितले.
या पाहणीवेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजयुमो माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, भाजपा जिल्हा सचिव सारंग साळवे, तालुका महामंत्री सुभाष धाईत, भाजपा अनु.जाती तालुकाध्यक्ष अनिल मशाखेत्री, बाळूभाऊ उंदीरवाडे, संजय कडू, सुभाष खोबरे, गजानन मेश्राम, दिलीप गावडे, नरेश नीमलवार, सौरभ सहारे, गजानन साळवे, गजानन परचाके, महिला तालुका अध्यक्ष भुमाला परचाके, माजी सभापती अनुशया कोरेटी यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #mlanarote

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here