कोपर्शी जंगलातील भीषण चकमक : ठार झालेल्या ४ नक्षलींची ओळख पटली

465

कोपर्शी जंगलातील भीषण चकमक : ठार झालेल्या ४ नक्षलींची ओळख पटली
The गडविश्व
गडचिरोली, दि. २८ : गडचिरोली–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या थरारक चकमकीत गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफच्या संयुक्त पथकाने मोठा पराक्रम गाजवत चार जहाल नक्षलींना कंठस्नान घातले. या ठार झालेल्या माओवादींची ओळख पटली असून त्यामध्ये पीपीसीएम दर्जाचा वरिष्ठ कॅडर आणि तब्बल तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. शासनाने यांच्यावर मिळून १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
२५ ऑगस्टपासून अवघड जंगल व सततच्या पावसाचा सामना करत सी-६० व सिआरपीएफच्या जवानांनी माओवादीविरोधी शोधमोहीम सुरू केली होती. काल सकाळी जवानांवर दबा धरून बसलेल्या माओवादींनी अचानक गोळीबार करत जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले; मात्र माओवादींनी गोळीबार वाढवल्याने प्रत्युत्तरादाखल जवानांनी कारवाई केली. तब्बल आठ तास चाललेल्या चकमकीनंतर घटनास्थळी एक पुरुष व तीन महिला नक्षली मृतावस्थेत आढळले.
ठार झालेल्यांमध्ये मालु पदा (४१, पीपीसीएम, कंपनी क्र.१० – बक्षीस ६ लाख), क्रांती ऊर्फ जमुना हलामी (३२, सदस्य, कंपनी क्र.१० – बक्षीस ४ लाख), ज्योती कुंजाम (२७, सदस्य, अहेरी दलम – बक्षीस २ लाख) आणि मंगी मडकाम (२२, सदस्य, गट्टा दलम – बक्षीस २ लाख) यांचा समावेश असून हे सर्व नक्षली चकमक, खून व जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांत वांछित होते.
घटनास्थळावरून पोलिसांनी एक एसएलआर, दोन इन्सास, एक .३०३ रायफल, ९२ जिवंत काडतुसे, तीन वॉकीटॉकी आणि मोठ्या प्रमाणावर माओवादी साहित्य जप्त केले आहे. या शौर्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोलीत माओवादीविरोधी अभियान आणखी तीव्र करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सन २०२१ पासून गडचिरोली पोलिसांनी ९१ माओवादी ठार, १२८ अटक व ७५ आत्मसमर्पण घडवून आणले असून हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. पोलीस अधीक्षकांनी पुन्हा एकदा सर्व माओवादींना शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #MaoistEncounter #C60Commandos #CRPF #PoliceOperation #Naxalism #MaharashtraPolice #GadchiroliNews #SecurityForces #MaoistWomen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here