The गडविश्व
गडचिरोली,२५ मार्च : एटापल्ली तालुक्यातील वेळमागड येथे गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून गावातील महिला, पुरुष व युवक अशा एकूण ४३ स्पर्धकांसह ग्रामस्थांनी दारू व तंबाखू विक्री मुक्त गाव निर्माण करण्याचा संकल्प घेतला.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका चमूने दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये ४३ स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना जिल्हाधिकारी संजय मीना व सर्चचे संचालक समाजसेवक पदमश्री डॉ. अभय बंग यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र गावातील मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुक्तीपथ गाव संघटन सदस्य ग्रामसभा अध्यक्ष मानसू नैताम, दयामती एक्का, नागेश पवार व गाव संघटन सदस्य यांनी अथक प्रयत्न केले. या स्पर्धेचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार व तालुका चमूने केले.
