गडचिरोली पोलीसांनी मोठा डाव उधळला : रेकी करीत असलेल्या दोन नक्षल्यांना केली अटक

2737

– अटक करण्यात आलेल्या नक्षलीवर १० लाख रुपयांचे होते बक्षीस जाहीर

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑक्टोबर : वरीष्ठ नक्षल कॅडरकडुन उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्याकरीता रेकी करीत असलेल्या दोन नक्षल्यांना अटक करत गडचिरोली पोलीसांनी नक्षल्यांच्या विघातक प्रयत्नांचा डाव उधळून लावला आहे. सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (२४) रा. मोरचूल ता. धानोरा, समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे (२२) रा. मोरचूल ता. धानोरा जि. गडचिरोली असे अटकेतील नक्षलींची नावे आहेत अशी माहिती गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
प्राप्त माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंदे सावरगाव परिसरात गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असताना ०२ संशयीत व्यक्ती मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षली असल्याचे समजले त्यावरून त्यांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस मदत केंदे सावरगाव येथे अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांचीहि विचारपुस केली असता त्यांना वरीष्ठ नक्षल कॅडरकडुन उत्तर गडचिरोलीमध्ये दलम पूर्ववत करण्याकरीता पाठवल्याबाबतची माहीती दिली. परंतु या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल अधिक सतर्क होवून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.

अटक करण्यात आलेल्या सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे हा ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होवुन, डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणून २०१८ पर्वत कार्यरत होता. त्यानंतर ऑगस्ट २०१८ ते २०२० पर्यंत कंपनी १० मध्ये कार्यरत होता व सन २०२० ते आतापर्यंत पीपीसीएस म्हणून कंपनी १० मध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने नामे सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे याचेवर ८ लक्ष रूपये बक्षीस जाहीर केले होते.
तसेच समुराम ऊर्फ सूर्या घसेन नरोटे हा जन मिलिशिया सदस्य असून, महाराष्ट्र शासनाने त्याचेवर २ लक्ष रूपयेचे बक्षीस जाहिर केले होते. सदर दोन्ही नक्षल्यांचा खुन जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्हयामध्ये सहभाग असून, सदर अटक नक्षलींचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे उपस्थित होते.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे ऑक्टोबर २०२० ते आतापर्यंत एकूण १६ नक्षल्यांना अटक (शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस ६६ लक्ष रूपये), १९ नक्षल्यांचे आत्मसमर्पण (शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस १ कोटी २४ लक्ष रुपये.), ५५ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. (शासनान जाहिर केलले एकुण बक्षीस ४ कोटी १० लक्ष रुपये).

सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक (अभियान)सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात पार पडली.
पोलीस अधीक्षकअंकित गोयल सा. यांनी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षल्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

#gadchiroli news #gadchiroli police #naxal arrest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here