गडचिरोली : आता आरमोरी तालुक्यातही लंम्पी आजाराची लागण 

383
File Photo

– तालुक्यातील हे आहेत बाधीत क्षेत्र व निगराणी क्षेत्र
The गडविश्व
गडचिरोली, ११ नोव्हेंबर : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच लंम्पी आजाराने शिरकाव केला असतांना आता आरमोरी तालुक्यातही या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील पशुधनामध्ये लंम्पीस्किन डिसीज सदृश्य लागण झाल्याचे रोग लक्षणावरुन निर्दशनास आले असून जिल्ह्यातील तांत्रिक अधिकाऱ्यांनी नक्की केलेले आहे. तसेच भारत सरकारच्या व आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय नुसार रोग प्रतिबंध व नियंत्रणासाठी मार्गदर्शक सुचना निर्गमीत करण्यात आलेले आहेत. त्याअर्थी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली, संजय मीणा आदेश निर्गमीत केले आहेत.

प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गीक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्हाधिकारी यांना अधिनियमातील अधिकार वापरासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रदान करण्यात आलेले आहेत.
लंम्पी स्किन रोग प्रादुर्भाव ग्रस्त व बाधित झालेल्या आरमोरी तालुक्यातील वासाळा हे गांव बाधित क्षेत्र म्हणून घोषीत केले आहे. तसेच रोग प्रार्दुभावाच्या ठिकाणापासून ५ कि.मी. त्रिजेच्या परिसर सर्तकता क्षेत्र म्हणून घोषीत केला आहे. या सतर्कता क्षेत्रात आरमोरी तालुक्यातील ठाणेगांव, वनखी, चामोर्शी माल, डोंगरगांव भु. ही गावे समाविष्ट आहे. या परिसरातील गांवामध्ये बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गीय जनावरांना प्रतिबंधक लसीकरण केले गेले नसल्यास करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने इत्यादी पुढील आदेशापर्यत स्थगित करण्यात आलेले आहे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येत आहे. तसेच बाधित गावामध्ये बाधित जनावरांचे विलगीकरण करुन त्यांच्या पिण्याच्या पाण्याकरीता व खाण्याकरीता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची ऑनलाईन पद्धतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधीत करण्यात येत आहे. गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधित परिसरात संबंधित ग्रामपंचायतींनी स्वच्छता व निजर्तुंक द्रावणाची फवारणी करुन निजर्तुंकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादीचा नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लंम्पीस्कीन रोगाचा विषाणु वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य बनविणाऱ्या संस्था मार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे, वळुंची चाचणी करुन रोगा करीता नकारार्थी आलेल्या वळुचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगाकरीता वापर करावा. लंम्पीस्कीन रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपरिषदा, व नगरपंचायती यांचे मार्फत त्यांचे भटक्या पशुधनांचे नियमीत निरीक्षण करण्यात यावे. तसेच बाधित पशुधनाची काळजी घ्यावी.
उपरोक्त कायद्याशीसुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांचे विरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करणे, तसेच कार्यवाही प्रस्तावित करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here