विधवा महीला व बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा व पात्र लार्भार्थ्यांना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या : अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर

272

– कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या दिल्या सूचना
The गडविश्व
चंद्रपूर : कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून विधवा झालेल्या महिलांना त्यांचे न्याय्य हक्क व पात्र लार्भार्थ्याना योजनांचा लाभ प्राधान्याने द्या, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कृती दलाची बैठक अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती, यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जाधव, मनपाच्या सहाय्यक आयुक्त विद्या पाटील, महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. वर्षा जामदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, शासकीय अपंग मुलांचे बालगृहाचे अधीक्षक करनेवार, महिला व बालकल्याण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी कांचन वरठी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कोविड काळात विधवा झालेल्या महिलांना योजनांचा लाभ देताना सर्व महिलांना प्राधान्य द्यावे, असे सांगून अपर जिल्हाधिकारी श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, तालुक्यातील सर्व पीडितांना आर्थिक मदत, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, तसेच योजनेस आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्यासाठी तालुकास्तरावर कॅम्प घेण्याचे आयोजन करावे. जेणेकरून त्या लाभार्थ्यांना विहित कालावधीत अत्यावश्यक कागदपत्रे प्राप्त होतील.
कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विधवा झालेल्या 150 महिलांना सह्याद्री फाऊंडेशन नागपूरतर्फे 30 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तर उर्वरित महिलांना निधी प्राप्त झाल्यानंतर आर्थिक मदत देण्यात येईल. आर्थिक मदत देताना गरजूंना प्रथम प्राधान्य द्यावे. असे त्या म्हणाल्या.
श्रीमती वरखेडकर पुढे म्हणाल्या, मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत महिला व बालविकास कार्यालयाकडून देण्यात आलेल्या गुगल फार्मवर माहिती भरण्यासाठी तालुक्यांना अवगत करावे.कोविड काळात बालकांच्या संरक्षण व संगोपनासाठी महिला व बालविकास विभागाच्या संपूर्ण टीमने पहिल्या दिवसापासूनच खुप मेहनत घेतली असून उत्कृष्ट कार्य केले आहे. असेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात आतापर्यंत 648 मुलांना बालसंगोपन योजनेचा आर्थिक लाभ देण्यात आला आहे. तर कोविड काळात विधवा झालेल्या 305 महिलांपैकी 135 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. बैठकीमध्ये बालगृहे, बालसंगोपन योजना, मिशन वात्सल्य योजना, कोविड काळात विधवा झालेल्या महिला, कोविडमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची शालेय फी, लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे आदींबाबत महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी माहिती सादर केली.
तत्पूर्वी, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाबाबत अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. ज्या कार्यालयांनी अद्याप समिती स्थापन केली नाही, त्या संबंधित कार्यालयावर 50 हजाराची दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here